Saturday, October 09, 2010

पुनश्च हरिॐ

वाचकहो, गेले तीन चार महिने पोटापाण्याच्या कटकटींमुळे ब्लॉगकडे लक्ष द्यायला वेळ झाला नाही. काहीच लिहू शकलो नाही. पण मनाच्या कुठल्यातरी पातळीवर ब्लॉगचा विचार चालू होताच. 

काही नवीन विषय सुचले आहेत; तर काही जुने विषय बासनात गुंडाळून ठेवावे लागत आहेत. लेखनात सातत्य ठेवण्याच्या दृष्टीनेही काही प्रयत्न चालू आहेत.

लेखणी परत चालू होईपर्यंत असाच दयालोभ ठेवा. अधिक काय लिहिणे - लेखनसीमा.

Wednesday, May 12, 2010

तयार पापडांचे अर्थकारण

सध्या मला पापड खाण्याचा नाद लागला आहे. उडदाचे दोन पापड मायक्रोवेव्हमध्ये दीड मिनिट भाजायचे आणि हाणायचे - छान वाटतं. माझ्या आजीला या पापड-सत्राची गंमत वाटते. [मी पहिल्यापासून एककल्ली आहे असा तिचा समज आहे (ते विशेष खोटं आहे असं नाही...)]

मला ती बोलता बोलता म्हणाली, "हल्ली काय, तयार पापड विकत आणायचे आणि खायचे. आमच्यावेळी..." यापुढे गाडी वाळवणं, शेजारणी, कावळे, सबनिसांचा अंतू (जो पहाता पहाता वाळवणं फस्त करायचा) वगैरे स्टेशनं घेत जाणार हे उघड होतं. हल्लीच्या ‘रेडीमेड’ संस्कृतीबद्दलचा तिचा विषाद जाणवून गेला.

काळ बदलला, संस्कृती बदलणं अपरिहार्य आहे. आजीच्या काळापेक्षा आज अर्थव्यवस्था पुष्कळच प्रगत आहे. बदलत्या अर्थव्यवस्थेप्रमाणे श्रम आणि कौशल्यांची विभागणी (division of labour and specialisation) आपोआप होत जाते.

अ‍ॅडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाने लिहून ठेवलं आहे:
The greatest improvement in the productive powers of labour, and the greater part of the skill, dexterity, and judgment with which it is anywhere directed, or applied, seem to have been the effects of the division of labour.
पण हेच एकमेव कारण नाही.

गेल्या पन्नास वर्षांत पूर्वीच्या एकत्र कुटुंबांचं विकेंद्रीकरण (neuclearisation) झालं. पूर्वीच्या कुटुंबांत चुलते-चुलत मिळून सुमारे २५ जण तरी असायचे. अधिक एखाद-दुसरा आश्रित, शिकायला ठेवलेला कोणतातरी दूरचा भाचा, गडीमाणसं, असा मोठा बारदाना असायचा. अधिक पंक्तीला दोनपाच मेव्हणे-पाव्हणे, आलागेला असे अजून चारपाच जण. एवढ्या माणसांचा स्वैपाक करणं हे त्या एकत्र कुटुंबांतल्या गृहिणींच्या ‘टीम’चं प्रमुख काम असायचं.

साधा हिशोब करूया: अशी अंदाजे ३० माणसं, आठवड्यातून (धरून चाला) तीनदा, प्रत्येकी दोन पापड खाणार. म्हणजे झाले [३० (माणसं) गुणिले २ (पापड प्रत्येकी) गुणिले २ (जेवणं) गुणिले ५२ (आठवडे)] वर्षाकाठी ६,२४० पापड. हे पापड घालायला घरच्या ५ लक्ष्म्या अधिक ३ शेजारणी, मैत्रिणी, गडी-स्त्रिया तरी असाव्यात - म्हणजे [६,२४० भागिले ८] ७८० पापड प्रत्येकी.

आता आजच्या चौकोनी कुटुंबाचा हिशोब (पापड खाण्याचं प्रमाण तेच ठेवून) - [४ (माणसं) गुणिले २ (पापड प्रत्येकी) गुणिले २ (जेवणं) गुणिले ५२ (आठवडे) बरोबर ८३२ पापड भागिले एकच गृहलक्ष्मी].

म्हणजे याचा अर्थ असा, की जर घरच्या घरी पापड घालायचा अट्‌टहास आजच्या चौकोनी कुटुंबातल्या गृहिणीने केला, तर तिचं काम (पूर्वीच्या एकत्र कुटुंबातल्या गृहिणीच्या तुलनेत) वाढेल! म्हणजे ‘छोटं कुटुंब, कमी काम’ हा सिद्धांत बोंबलला!

अजून एक बाब ध्यानात घ्यायला हवी. एकत्र कुटुंबांतल्या गृहिणीपेक्षा चौकोनी कुटुंबातली गृहिणी नोकरी करत असण्याची शक्यता जास्त आहे - चूल+मूल विरुद्ध चूल+मूल+ऑफिस. म्हणजे चौकोनी कुटुंबातल्या गृहलक्ष्मीला एक तर वेळ कमी आहे, आणि हातात हक्काचा पैसा आहे. एकत्र कुटुंबातल्या नोकरी न करणाऱ्या गृहलक्ष्मीच्या बरोबर उलट.

मग अशा परिस्थितीत तयार पापडांची बाजारपेठ तयार होणं स्वाभाविक आहे - (तुमच्याकडे तुलनेने जास्त असलेले) पैसे टाका, आणि (तुमच्याकडे तुलनेने कमी असलेला) वेळ वाचवा!

हा बदल नक्कीच हवाहवासा आहे - या योगाने पूर्वी कधीच अस्तित्त्वात नसलेली पापडाची बाजारपेठ तयार झाली. ‘लिज्जत पापड’ सारख्या संस्था उदयाला आल्या, आणि त्यांनी ‘लाटता येणे’ हे एकमेव कौशल्य (skill) अंगी असणाऱ्या स्त्रियांना रोजगार दिला. अर्थचक्राला गती मिळाली.

एकत्र कुटुंबांच्या विकेंद्रीकरणामुळे अशा अनेक नवीन वस्तू / सेवा जन्माला आल्या आहेत - चिरलेल्या भाज्या, पेस्ट कंट्रोल, तयार पीठ वगैरे.

कालाय तस्मै नमः ॥

_______________

तळटीप: माझ्या आजीचा जन्म झाला तेव्हा पुण्यात वीजसुद्धा नव्हती. आज तिचा नातू लॅपटॉपवर मराठीत लिहितो आणि मोबाईलवरून प्रसिद्ध करतो! 


१९२० ते १९३० या काळात जन्माला आलेल्या या पिढीने खूप दुनियादारी पाहिली. कसे पचवले असतील त्यांनी हे बदल?

Friday, April 02, 2010

शब्दब्रह्माची चोरी


परवा माझ्या जवळच्या मित्राच्या आईचा फोन आला होता. ही काकू कविता वगैरे करते. तिच्या मैत्रिणींच्या संमेलनात (reunion) तिने काही कविता वाचून दाखवल्या. सगळ्यांना त्या आवडल्या. एका मैत्रिणीने तर विशेष कौतुक करून काही कविता लिहून वगैरे घेतल्या. काही दिवसांनंतर एका ‘हौशी’ मासिकात या कविता छापून आल्या – अर्थातच त्या मैत्रीणबाईंच्या नावे!

काकूला सहाजिकच प्रचंड मनस्ताप झाला. ‘लोकं अशी का वागतात?’ हा सनातन प्रश्न तिला नव्याने पडला.

या प्रकाराला ‘वाङमयचौर्य’ (literary plagiarism) अशी संज्ञा आहे. जडजंबाल शब्दांत याची व्याख्या करता येईल, पण सोपं सांगायचं तर दुसर्‍याचं लेखन (मूळ लेखकाला श्रेय न देता) copy paste करणे म्हणजे ‘वाङमयचौर्य’. त्याहून सोपं म्हणजे “हाण सावळ्या”!

हा रोग इंग्रजी कादंबरी विश्वापासून ते मराठी ब्लॉग विश्वापर्यंत सर्वदूर पसरलेला आहे. काही वर्षांपूर्वी काव्या विश्वनाथन या भारतीय लेखिकेवर वाङमयचौर्याचा आरोप झाला होता. (तिचं पुस्तक नंतर बाजारपेठेतून काढून घेण्यात आलं.) मराठी ब्लॉग विश्वातले ज्येष्ठ ब्लॉगकार नंदन होडावडेकर यांच्या काही लेखनाचीही सरळसरळ चोरी झाली. त्यांनी काढलेले क्षोभपूर्ण उद्गार येथे वाचा.

या प्रकाराचा आपण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करू.

वाङमय हे ‘माहिती’च्या (information) स्वरूपात असतं. माहिती या वस्तूचे काही विशिष्ट अर्थशास्त्रीय गुणधर्म असतात.
१.      माहिती ‘निस्पर्धक’ आहे (information is non-rivalrous)
तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीबरोबर आईस्क्रीमच्या दुकानात जाता - एक आईस्क्रीमचा कोन (स्वतःच, एकट्याने) खाता. तोच कोन तुमच्या प्रिय व्यक्तीला खाता येत नाही, कारण तो खाऊन संपतो! प्रिय व्यक्तीला नवीन कोन घ्यायला लागतो! **

आता समजा दुकानात एकच कोन आहे – एकालाच मिळेल! आता त्या कोनसाठी तुम्ही ‘प्रतिस्पर्धी’ आहात!

माहिती या वस्तूचं तसं नसतं. एकाला मिळालेली माहिती तो दुसर्‍याला देतो. चांगलं पुस्तक वाचनात आलं, की आपण दुसर्‍याला सांगतो. आपण माहितीचा उपभोग घेतला (consumption), तरी माहिती (आईस्क्रीमसारखी) संपत नाही. (माहितीचा उपभोग घेणार्‍याने जर भर घातली, तर माहिती उलट वाढू शकते. विकीपीडीया याच तत्त्वावर चालतो.)

२.      माहिती स्वस्त आहे
माहितीची ‘वाढीव किंमत’ (marginal cost) जवळजवळ शून्य असते. एक पुस्तक छापलं, की त्याच्या प्रती करायला जास्त खर्च येत नाही. नवीन तंत्रज्ञानामुळे तर ही वाढीव किंमत अजून कमी होऊन शून्यच होते. (आठवा: डाऊनलोड केलेली mp3 गाणी, पायरेटेड चित्रपटांच्या CD/DVD, पायरेटेड पुस्तकं वगैरे.)

याचे परिणाम पहा:
१.      माहितीचं रक्षण सहसा कोणी करत नाही
२.      (त्यामुळे) माहितीची चोरी करणं सोपं असतं
३.      माहितीच्या चोरीची दखल सहसा कोणी गंभीरपणे घेत नाही
४.      (त्यामुळे) माहितीच्या चोरीत काही लांच्छनास्पद आहे, असं समाजाला वाटत नाही (absence of social stigma)

अनिर्बंध बोकाळलेल्या वाङमयचौर्याची ही कारणं आहेत. लेखकाच्या दृष्टीने हे अत्यंत तापदायक आहे. वाङमयचौर्यात होरपळून अनेक लेखकांना उबग येतो – आणि ते लिहायचंच बंद करतात!

वर उल्लेख केलेल्या नंदन होडावडेकरांच्या ब्लॉगवरून हे स्पष्ट दिसतं. मार्च २००८ मध्ये वाङमयचौर्यावर भाष्य करणारा त्यांचा लेख प्रसिद्ध झाला. त्याआधीचे ३८ महिने श्री. नंदन यांच्या लेखनाची सरासरी महिन्याकाठी १.२७ लेख एवढी होती. मार्च २००८ नंतर हीच सरासरी महिन्याकाठी ०.२५ लेख एवढी आहे. म्हणजे तब्बल ८०% घसरण झालेली आहे! ##

वाङमयचौर्यावर दुर्दैवाने काही जालीम / रामबाण उपाय नाही. हे होणार, होतच रहाणार. प्रतिबंधाचे दोन उपाय आहेत – मागणी-बाजूचे उपाय (demand-side) आणि पुरवठा-बाजूचे उपाय (supply-side).

पुरवठा-बाजूचे उपाय – जगाला बदला!
१.      कायदेशीर कारवाई
स्वामित्वहक्क कायद्यांचा (intellectual property law) आधार घेऊन चोरांवर कायद्याचा आसूड उगारता येईल. पण हे सर्वांना शक्य नाही. हौशी कवयित्री आणि ब्लॉगलेखकांना तर नाहीच नाही!

२.      प्रतिबंध
आपला ब्लॉग संरक्षित (uncopiable) करा. ब्लॉगवर उजवी टिचकी (right click) मारायला मनाई करा.

मागणी-बाजूचे उपाय – स्वतःला बदला!
१.      धिक्कार करा
चोराला सोडू नका. काही नाही तर त्यावर तोंडसुख तर आपण नक्की घेऊ शकतो. शक्य तितक्या सार्वजनिक ठिकाणी त्याचं वाभाडं काढा. त्याने सामाजिकदृष्ट्या लांच्छनास्पद, कलंकित कृत्य केलंय याची जाणीव करून द्या. यानेच तो social stigma निर्माण व्हायला मदत होईल.

२.      दुर्लक्ष करा
काळाच्या ओघात सक्षम असेल तेच टिकतं. (Survival of the fittest.) आठशे वर्षांनंतरही मराठीच्या अभ्यासकाला ‘ज्ञानेश्वरी’ची मोहिनी पडते. तुमचं लेखन काळाच्या कसोटीला सिद्ध होईल, याचा विश्वास बाळगा. याचा अर्थ वाङमय-चोराला माफ करा असा होत नाही – क्षमा करा, पण विसरू नका! (Forgive but don’t forget).

३.      सकारात्मक दृष्टिकोन
“आहेच माझं लेखन छान – कोणालाही चोरण्याचा मोह पडेल!” असा विचार करा. डोकं शांत ठेवा, लिहिते व्हा, लिहीत रहा!
राष्ट्रकवी समर्थ रामदास लिहून गेलेले आहेत:
श्रेष्ठ कार्ये करी श्रेष्ठ | कृत्रिम करी तो कनिष्ठ |
कर्मानुसार प्राणी नष्ट | अथवा भले ||११||
राजे जाती राजपंथें | चोर जाती चोरपंथें |
वेडें ठके अल्पस्वार्थें | मूर्खपणें ||१२||
मूर्खास वाटे मी शहाणा | परी तो वेडा दैन्यवाणा |
नाना चातुर्याच्या खुणा | चतुर जाणे ||१३||
(श्री दासबोध, समास पाचवा)

चाफळच्या या संन्याशाच्या वाङमयाची चोरी कोणी केली नाही – समर्थांनी चोराच्या कानाखाली जाळ काढला असता! धटासी असावे धट, उद्धटासी उद्धट…

__________________________________ 
तळटीपा:
** या परिस्थितीवरचा उपाय सुज्ञ वाचकांना आगोदरच उमगला असेल! एकच कोन अर्धा-अर्धा खाणे! [अर्धा कोन कसा खावा याबद्दल सुज्ञांस आम्ही काय सांगावे ;)] हा उपाय अर्थशास्त्राच्या Game Theory या शाखेच्या co-operation या उपशाखेत येतो. त्याबद्दल लिहीनच!
## होडावडेकर एक प्रतिभावंत लेखक / समीक्षक आहेत. त्यांच्या या ‘साहित्यिक मौना’मुळे मराठी सारस्वताचं नुकसान होत आहे. नंदन, तुमच्या वाचनात हा लेख कधी आला, तर माझी विनंती ऐका, परत लिहायला लागा…

Saturday, March 20, 2010

अंतू बर्वा आणि विमानप्रवास - बर्वाकॉनॉमिक्स भाग १


अंतू बर्व्याच्या अर्थशास्त्राविषयी पाच लेख लिहिण्याचा संकल्प सोडला आहे. त्या मालिकेतला हा पहिला लेख.
----


‘फुकट ते पौष्टिक’ हा मानवी स्वभाव आहे. पण ‘फुकट’ सर्वार्थाने ‘फुकट’ नसतं आणि ते ‘पौष्टिक’ क्वचितच असतं हे चार झटके खाल्ल्यानंतर आपल्याला उमजतं.


तरीही कुठलीही वस्तू फुकट (किंवा कमी किमतीत) मिळवण्याचा आपला हव्यास सुटत नाही. (‘बिग बाजारा’त ‘सबसे सस्ते चार दिन’ असले, की तोबा गर्दी उसळते; गब्बर पगार असणारे लोकसुद्धा ‘डॉमिनोज’ची सवलतीची कुपन्स जपून ठेवतात.)


हा झगडा मूलभूत आहे  मूल्य (value) विरुद्ध किंमत (price). माणसाचा असा प्रयत्न असतो, की कमीत कमी किंमत मोजून जास्तीत जास्त मूल्य मिळवायचं! ‘फुकट ते पौष्टिक’ ही त्यातलं एक टोक  शून्य किंमत, शून्यापेक्षा जास्त मूल्य!


अंतूशेटची कल्पनाच पहा ना!
उन्हाळ्यात कुठली तरी मुंबईची दुय्यम नाटक कंपनी झापाच्या थेटरात 'एकच प्याला' घेऊन आली होती. संच जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोड्याच्या बाटल्यांचे चीत्कार सुरू झाले. किटसनच्या प्रकाशात अंतूशेटची मूर्ती दिसली. अंतूशेट फरक्यापवाल्या मॅनेजरशी चर्चा करत होते.
"कशी काय गर्दी ?"
"ठीक आहे !"
"प्लान तर मोकळाच दिसतोय. सोडता काय अर्ध्या तिकिटात ?"
"छे ! छे !"
"अहो, छे छे म्हणून झिटकता काय पाल झाडल्यासारखे ? पहिला अंक ऐकला मी हितूनच. सिंधूच्या पार्ट्यात काय दम दिसत नाही तुमच्या. 'लागे हृदयीं हुरहुर' म्हणजे अगदीच पिचकवणी म्हटलंनीत. बालगंधर्वाचं ऐकलं होतंत काय ?" नेहेमीप्रमाणे शेवटला 'काय' उडवीत अंतूशेट म्हणाले.
मॅनेजरही जरा उखडले. "आग्रह नाही आमचा तुम्ही नाटक बघायला चला असा."
"गावात आग्रहाचे बोर्ड तर टांगले आहेत - आणि काल घरोघर जाहिरातीची अक्षतदेखील घेऊन हिंडत होते तुमचे ब्यांडवाले! अहो, एवीतेवी रिकाम्या खुर्चीला नाटक दाखवायचं - चार आण्यात जमवा."
"चार आण्यात बघायला काय डोंबा~याचा खेळ आहे काय ?"
"अहो तो बरा ! आधी खेळ तो दाखवतो आणि मग थाळी फिरवतो. तुम्ही तसं करा. पुढलं 'कशि या त्यजूं पदाला' जमलं फक्कड तर थाळीत चार आणे आणखी टाकीन." बाजूची मंडळी हसली आणि मॅनेजर उखडला. तेवढ्यात अंतूशेटची नजर माझ्याकडे वळली.


अंतूशेटचा अर्थशास्त्रीय विचार पहा: नाटक कंपनीने हा प्रयोग करण्यासाठी संपूर्ण खर्च केलेलाच आहे. जी काय तिकीटविक्री व्हायची ती झालेलीच आहे. पण ’प्लान’ मोकळाच आहे. एक अंक झाल्याने अजून काही तिकीटविक्री व्हायची शक्यताही संपलेली आहे. अशा वेळेला मिळणारं कोणतंही उत्पन्न नाटक कंपनीच्या मॅनेजरच्या दृष्टीने ‘वाढीव उत्पन्न’ (marginal income) आहे. यात नाटक कंपनीसाठी काही ‘वाढीव खर्च’ (marginal cost) नाही, कारण एवीतेवी रिकाम्या खुर्च्यांनाच नाटक दाखवायचं!


वाचकहो, यात फायदा दोन्ही बाजूंचा झाला असता – अंतूशेटना अर्ध्या तिकिटात नाटक पहायला मिळालं असतं, आणि नाटक कंपनीला चार आण्यांचं वाढीव उत्पन्न मिळालं असतं.


मॅनेजरचं अर्थशास्त्र म्हणा (किंवा व्यवहारज्ञान म्हणा) कच्चंच दिसतंय. अंतूशेटची ऑफर त्याने नाकारली.


काही व्यवसायच असे असतात, की ज्यात बहुतांशी खर्च हे ‘अचल’ असतात (fixed costs). नाटक हा त्यातलाच एक व्यवसाय – नाटकाचा संच, नेपथ्य, प्रवास असे अनेक खर्च अचल आहेत, पण प्रयोगावेळी तिकीटविक्री होईलच याची शाश्वती नाही. प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ झाला, तर निर्मात्याला प्रचंड फायदा, नाहीतर प्रचंड तोटा. नाटकधंद्यात जोखीम (risk) असते ती याचीच!


ज्या व्यवसायात अचल खर्च (fixed costs) जास्त असतील आणि विक्री (sale) होत नाही, तिथे अंतूशेटची ही कल्पना ग्राहकाचा फायदा करून देईल!


जे लोक नियमितपणे विमानप्रवास करतात त्यांना ही कल्पना राबवता येईल. समजा, विमान सुटायला पंधरा मिनिटं उरलेली आहेत आणि विमानात पाच जागा शिल्लक आहेत. एक प्रवासी येतो, म्हणतो, मला त्यातली एक जागा द्या, मी तुम्हाला पाचशे रुपये देतो. विमान कंपनीच्या दृष्टीने `अर्थशास्त्रीय वर्तणूक’ (economic behaviour) काय आहे?


विमान कंपनी काय विचार करेल पहा: त्या सीटचं भाडं खरं तर दोन हजार रुपये आहे, आणि त्यावर आपण एक हजार रुपये खर्च केलेला आहे. पंधराच मिनिटं हातात आहेत. जर या ग्राहकाला नाकारलं, तर विक्री तर रुपयाची होणार नाही, पण हजार रुपयांचा बांबू बसेल! त्यापेक्षा याला विमानात घेऊ या – पाचशे तर पाचशे! हजार रुपयांच्या खर्चातले पाचशे तर सुटले – चोराच्या हातची लंगोटी!


अंतूशेटचं अर्थशास्त्र असं आहे, मंडळी – मनोरंजनात शहाणपण, स्वार्थात परमार्थ! आम के आम और गुठलियों के दाम!

Saturday, March 13, 2010

बर्वाकॉनॉमिक्स – अंतू बर्व्याचं अर्थशास्त्र


कोकणी माणूस हे रसायनच अजब आहे. पु लं लिहून जातात:
“विशाल सागरतीर आहे, नारळीची बने आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारे काही आहे; पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जाते आणि मग उरते एक भयाण विनोदाचे अभेद्य कवच!”
मराठी साहित्यात श्री. ना. पेंडसे, गो. नी. दांडेकर, चि. त्र्यं. माडखोलकर, जयवंत दळवी अशा अनेक सिद्धहस्त लेखकांनी कोकणावर, कोकणी माणसावर भरभरून लिहिलं आहे. एकएक पात्र मनात कायमचं रुतून रहातं – श्रीनांचा ‘अफाट बापू’, गोनीदांची ‘शितू’, दळवींची ‘गंगू भावीण’…

या सर्व साहित्यात कोकणी माणूस त्याच्या स्वभाववैशिष्ट्यांसह आला आहे. डोळ्यांसमोर एक स्पष्ट प्रतिमा उभी रहाते. दारिद्र्य, त्यायोगे येणारं दैन्य, हिशोबीपणा, थोडासा चिक्कूपणा. कृपणता, तोलून-मापून घेण्याची वृत्ती, पैसा वसूल करण्याकडे (value for money) असलेला कल, अशी अनेक लक्षणं सांगता येतील.

“कोकणी माणूस असा का?” या प्रश्नाला भौगोलिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, आर्थिक असे अनेक पदर आहेत. सगळे पदर उलगडण्याची माझी कुवत नाही. कोकणी माणसाच्या स्वभावाची अर्थशास्त्रीय बाजू समजावून घेणे हा या लेखनप्रपंचाचा उद्देश आहे.

कोकणी माणूसच का?

प्रत्येक मानवसमूहाला (ethnic group) आपापलं वैशिष्ट्य असतं. कित्येकदा ते वैशिष्ट्य अर्थशास्त्रीयसुद्धा असतं. अशी वैशिष्ट्ये सामान्यीकरणातून (generalisation) जन्माला येतात. उदा. ‘चिक्कू मारवाडी’. त्यांचं मूळ सामान्यीकरणात असल्याने त्याला अपवादही असतात.

मला ही वैशिष्ट्ये आवडतात. आपल्या संस्कृतीची नाळ त्यांच्याशी जोडलेली असते. माझा कोकणी माणसांवर कोणताही राग नाही, उलट अपार जिव्हाळा आहे. महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही समूहापेक्षा कोकणी माणसावर जास्त लिहिलं गेलंय, त्यामुळे जास्त ‘माहिती-बिंदू’ (data points) उपलब्ध आहेत, इतकंच!

‘अंतू बर्वा’च का?

याची दोन कारणं आहेत. एकतर पु लं हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असल्यामुळे बहुतेक वाचकांनी ‘अंतू बर्वा’ वाचलेला / (टीव्हीवर) पाहिलेला / ऐकलेला असतो. त्यामुळे गंगू भाविणीपेक्षाही अंतूशेटना जास्त ‘अपील’ आहे!

दुसरं कारण म्हणजे, पु लंच्या इतर साहित्यापेक्षा ‘अंतू बर्वा’ हे व्यक्तिचित्र जरा वेगळं आहे. पुलंच्या लेखनात ‘मनोरंजक’ आणि ‘वैचारिक’ असे दोन भाग पडतात. सहसा हे दोन्ही भाग एकत्र दिसत नाहीत. (‘एक शून्य मी’ सारख्या वैचारिक लेखनात विनोद अभावानेच दिसतो आणि ‘हसवणूक’ सारख्या लेखनात उगाच वैचारिकतेचं बेगड नाही.) पुलंनी साहित्याचा उपयोग propoganda म्हणून कधीच केला नाही.

पण पुलं अंतूच्या करवी अनेक मतं, राजकीय / सामाजिक विधानं करवतात. अंतूच्या व्यक्तिमत्त्वाला त्यामुळे वेगळीच झिलई चढते. आणि अर्थशास्त्र्याला झिलईचा मोह पडावा, यात नवल काय?

तर मंडळी, आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल, की हा एका लेखाचा विषय नाही. अंतू बर्व्याच्या अर्थशास्त्रावर पाच लेख लिहिण्याचं योजलं आहे. सत्य संकल्पाचा दाता विश्वेश्वर आहे. तरी वाचकहो, आपली कृपादृष्टी असू द्यावी.

लेखनसीमा.

Tuesday, March 09, 2010

कुमार केतकरांच्या बोहारणी


रविवार ७ मार्च २०१० च्या ‘लोकसत्ता’मध्ये संपादक कुमार केतकर यांचा ‘बोहारणींचे अर्थशास्त्र’ हा लेख प्रकाशित झाला आहे. तो लेख येथे वाचता येईल.

जागतिकीकरण, त्याचे परिणाम, बाजाराभिमुख अर्थव्यवस्था (market economy) अशा अनेक गोष्टींना केतकरांचा लेख (ओझरता का होईना, पण) स्पर्श करून जातो. कुमार केतकरांच्या योग्यतेबद्दल आणि विद्वत्तेबद्दल शंकाच नाही, पण स्पष्टच सांगायचं झालं, तर थोडी निराशाच झाली.

लेखाच्या केंद्रस्थानी (आणि शीर्षकात) असलेल्या ‘बोहारीण’ आणि ‘सॉफ्टवेअर इंजिनियर / माहिती तंत्रज्ञान क्षेत्र’ या तुलनेतच गफलत आहे. केतकर लिहितात:
पण अर्थशास्त्रीय परिभाषेत सांगायचे तर भारतातला एमबीए वा सॉफ्टवेअर इंजिनियर तिकडे जातो वा याच देशात राहून तिकडचेआयटी कॉन्ट्रॅक्ट घेतो, तेव्हा तो त्या बोहारणीच्या, रद्दीवाल्याच्या वा कल्हईवाल्याच्या भूमिकेतच असतो. आणि जी कंपनी त्याच्यासव्र्हिसेसघेते, ती कंपनी जुने कपडे देणाऱ्या त्यामालकिणीच्या भूमिकेत असते. जेव्हा एखाद्या बडय़ा मल्टिनॅशनल कंपनीचे आयटी कॉन्ट्रॅक्ट एखाद्या भारतीय कंपनीला मिळते, तेव्हा ती कंपनी अगदी बडी असली तरी त्या बोहारणीसारखीच व्यवहार करत असते. ती बोहारीण पातेलं वा भांडे देत असे. हीआजची बोहारीणसॉफ्टवेअर डेव्हलप करून देते.

सेवांचा पुरवठा (rendering of services) या एकाच मुद्यावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आणि बोहारीण यांची तुलनाच चुकीची आहे. जर ‘सेवा’ हा एकच मुद्दा धरायचा, तर मग तुलना वेश्येशी का नको?

जगात विकण्यासारखी वस्तू / सेवा असेल, तर धंदा चालतो. प्रत्येक व्यवसायात ती वस्तू / सेवा निरनिराळी असू शकते. वस्तू-वस्तूंत आणि सेवा-सेवांतही फरक असतो. बोहारीण आणि माहिती तंत्रज्ञान, या दोन्ही सेवाच असल्या, तरी त्यातले फरक असे:

बोहारीण
माहिती तंत्रज्ञान
विक्रेत्याला मिळणार्‍या फायद्याचे स्वरूप
-    घाऊक बाजारातून स्वस्त दरात भांड्यांची खरेदी
-    जुन्या कपड्यांच्या बाजारात डागडुजीनंतर विक्री
भारतात कमी खर्चात सॉफ्टवेअर निर्मिती
ग्राहकाला मिळणार्‍या फायद्याचे स्वरूप
-    किरकोळ (retail) बाजारापेक्षा कमी किमतीत भांड्यांची खरेदी
-    घरातल्या निरुपयोगी अडगळीला योग्य मोबदला
स्वतःच्या देशापेक्षा कमी खर्चात सॉफ्टवेअर
कच्च्या मालाचे स्वरूप
भांड्यांचा घाऊक बाजार
सॉफ्टवेअर इंजिनियर
विक्रीचे तत्त्व
वस्तूंची अदलाबदल (barter)
सेवेच्या बदल्यात रोख पैसे
बौद्धिक स्वामित्व हक्कांची निर्मिती (creation of intellectual property)
होत नाही
होते

अर्थशास्त्रात एखाद्या वस्तूचं मोल (utility) हे ते मोल कोणाच्या ‘लेखी’ आहे त्यावरून ठरतं. (उदाहरणार्थ: ‘शिवास रीगल’ च्या बाटलीचं मोल ‘तळीरामा’च्या लेखी; सखाराम गटणेसाठी ते ‘उत्तेजक पेय’ असल्यामुळे निरुपयोगी!!) आपल्या उदाहरणात जुन्या कपड्यांना मालकीणबाईच्या लेखी मोल नाही, पण भांड्यांच्या लेखी आहे; तर बोहारणीलेखी परिस्थिती एकदम उलटी! मालकीणबाईंना भांडं तर मिळालंच, पण जुन्या कपड्यांची अडगळसुद्धा हटली!

माहिती तंत्रज्ञान उद्योगात प्रकार वेगळाच असतो. केतकरांच्याच शब्दांत:
“युरोप-अमेरिकेच्या अतिशय प्रगत अर्थव्यवस्थेला सॉफ्टवेअर हॅण्डल करणारे मजूर आणि मॅनेजर्स हवे असतात. त्यांच्या देशात ते त्या प्रमाणात उपलब्ध नसतात वा असले तरी त्यांचीकिंमतजास्त असते. मग असे आधुनिकसुशिक्षित तंत्रज्ञ मजूर त्यांना भारत, चीन, मलेशिया, व्हिएतनाम अशा देशांमध्ये मिळतात. या व्यवहारात दोघांचा फायदा असतो. इतकेआयटीजॉब्ज् तयार करण्याएवढी आपली अर्थव्यवस्था प्रगत आधुनिक नाही. त्याचप्रमाणे आपल्याला त्या तंत्रज्ञानाच्या मोबदल्यात जे पैसे मिळतात, ते त्यांच्या दृष्टीने कमी वा किफायतशीर असले, तरी आपल्या दृष्टीने खूप जास्त असतात.

बोहारणीच्या व्यवसायाचे तत्त्व ‘परस्परपूरक मूल्यां’मध्ये दडलं आहे, तर माहिती तंत्रज्ञान व्यवसायात अशी काही भानगड नाही.

असो. पण केतकरमहोदयांना अर्थशास्त्राविषयी प्रेम आहेच. (त्यांनी गतवर्षी लोकरंग पुरवणीत अच्युत गोडबोले लिखित ‘अर्थात’ ही अर्थशास्त्रविषयक लेखांची मालिका प्रकाशित केली होती.) आमच्या 
शास्त्राविषयी त्यांचं प्रेम असंच कायम राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

केतकरांनी एक मनोरंजक प्रश्न जाता-जाता विचारला आहे. ते विचारतात: अजूनही इंग्रजी मराठी वर्तमानपत्रांच्या रद्दीचा भाव वेगवेगळा असतो- दोन्ही भाषांतील वृत्तपत्रे एकाच जातीच्या न्यूजप्रिंटवर छापली जातात, तरीही! असं का?
थोडं संशोधन करून (म्हणजे रद्दीवाल्याशी गप्पा मारून) याबद्दल कधीतरी लिहीन!

कॉपीराईट!

MyFreeCopyright.com Registered & Protected