कोकणी माणूस हे रसायनच अजब आहे. पु लं लिहून जातात:
“विशाल सागरतीर आहे, नारळीची बने आहेत, पोफळीच्या बागा आहेत, सारे काही आहे; पण त्या उदात्ततेला दारिद्र्य विलक्षण छेद देऊन जाते आणि मग उरते एक भयाण विनोदाचे अभेद्य कवच!”
मराठी साहित्यात श्री. ना. पेंडसे, गो. नी. दांडेकर, चि. त्र्यं. माडखोलकर, जयवंत दळवी अशा अनेक सिद्धहस्त लेखकांनी कोकणावर, कोकणी माणसावर भरभरून लिहिलं आहे. एकएक पात्र मनात कायमचं रुतून रहातं – श्रीनांचा ‘अफाट बापू’, गोनीदांची ‘शितू’, दळवींची ‘गंगू भावीण’…
या सर्व साहित्यात कोकणी माणूस त्याच्या स्वभाववैशिष्ट्यांसह आला आहे. डोळ्यांसमोर एक स्पष्ट प्रतिमा उभी रहाते. दारिद्र्य, त्यायोगे येणारं दैन्य, हिशोबीपणा, थोडासा चिक्कूपणा. कृपणता, तोलून-मापून घेण्याची वृत्ती, पैसा वसूल करण्याकडे (value for money) असलेला कल, अशी अनेक लक्षणं सांगता येतील.
“कोकणी माणूस असा का?” या प्रश्नाला भौगोलिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, आर्थिक असे अनेक पदर आहेत. सगळे पदर उलगडण्याची माझी कुवत नाही. कोकणी माणसाच्या स्वभावाची अर्थशास्त्रीय बाजू समजावून घेणे हा या लेखनप्रपंचाचा उद्देश आहे.
कोकणी माणूसच का?
प्रत्येक मानवसमूहाला (ethnic group) आपापलं वैशिष्ट्य असतं. कित्येकदा ते वैशिष्ट्य अर्थशास्त्रीयसुद्धा असतं. अशी वैशिष्ट्ये सामान्यीकरणातून (generalisation) जन्माला येतात. उदा. ‘चिक्कू मारवाडी’. त्यांचं मूळ सामान्यीकरणात असल्याने त्याला अपवादही असतात.
मला ही वैशिष्ट्ये आवडतात. आपल्या संस्कृतीची नाळ त्यांच्याशी जोडलेली असते. माझा कोकणी माणसांवर कोणताही राग नाही, उलट अपार जिव्हाळा आहे. महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही समूहापेक्षा कोकणी माणसावर जास्त लिहिलं गेलंय, त्यामुळे जास्त ‘माहिती-बिंदू’ (data points) उपलब्ध आहेत, इतकंच!
‘अंतू बर्वा’च का?
याची दोन कारणं आहेत. एकतर पु लं हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व असल्यामुळे बहुतेक वाचकांनी ‘अंतू बर्वा’ वाचलेला / (टीव्हीवर) पाहिलेला / ऐकलेला असतो. त्यामुळे गंगू भाविणीपेक्षाही अंतूशेटना जास्त ‘अपील’ आहे!
दुसरं कारण म्हणजे, पु लंच्या इतर साहित्यापेक्षा ‘अंतू बर्वा’ हे व्यक्तिचित्र जरा वेगळं आहे. पुलंच्या लेखनात ‘मनोरंजक’ आणि ‘वैचारिक’ असे दोन भाग पडतात. सहसा हे दोन्ही भाग एकत्र दिसत नाहीत. (‘एक शून्य मी’ सारख्या वैचारिक लेखनात विनोद अभावानेच दिसतो आणि ‘हसवणूक’ सारख्या लेखनात उगाच वैचारिकतेचं बेगड नाही.) पुलंनी साहित्याचा उपयोग propoganda म्हणून कधीच केला नाही.
पण पुलं अंतूच्या करवी अनेक मतं, राजकीय / सामाजिक विधानं करवतात. अंतूच्या व्यक्तिमत्त्वाला त्यामुळे वेगळीच झिलई चढते. आणि अर्थशास्त्र्याला झिलईचा मोह पडावा, यात नवल काय?
तर मंडळी, आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल, की हा एका लेखाचा विषय नाही. अंतू बर्व्याच्या अर्थशास्त्रावर पाच लेख लिहिण्याचं योजलं आहे. सत्य संकल्पाचा दाता विश्वेश्वर आहे. तरी वाचकहो, आपली कृपादृष्टी असू द्यावी.
लेखनसीमा.


0 comments:
Post a Comment