परवा माझ्या जवळच्या मित्राच्या आईचा फोन आला होता. ही काकू कविता वगैरे करते. तिच्या मैत्रिणींच्या संमेलनात (reunion) तिने काही कविता वाचून दाखवल्या. सगळ्यांना त्या आवडल्या. एका मैत्रिणीने तर विशेष कौतुक करून काही कविता लिहून वगैरे घेतल्या. काही दिवसांनंतर एका ‘हौशी’ मासिकात या कविता छापून आल्या – अर्थातच त्या मैत्रीणबाईंच्या नावे!
काकूला सहाजिकच प्रचंड मनस्ताप झाला. ‘लोकं अशी का वागतात?’ हा सनातन प्रश्न तिला नव्याने पडला.
या प्रकाराला ‘वाङमयचौर्य’ (literary plagiarism) अशी संज्ञा आहे. जडजंबाल शब्दांत याची व्याख्या करता येईल, पण सोपं सांगायचं तर दुसर्याचं लेखन (मूळ लेखकाला श्रेय न देता) copy paste करणे म्हणजे ‘वाङमयचौर्य’. त्याहून सोपं म्हणजे “हाण सावळ्या”!
हा रोग इंग्रजी कादंबरी विश्वापासून ते मराठी ब्लॉग विश्वापर्यंत सर्वदूर पसरलेला आहे. काही वर्षांपूर्वी काव्या विश्वनाथन या भारतीय लेखिकेवर वाङमयचौर्याचा आरोप झाला होता. (तिचं पुस्तक नंतर बाजारपेठेतून काढून घेण्यात आलं.) मराठी ब्लॉग विश्वातले ज्येष्ठ ब्लॉगकार नंदन होडावडेकर यांच्या काही लेखनाचीही सरळसरळ चोरी झाली. त्यांनी काढलेले क्षोभपूर्ण उद्गार येथे वाचा.
या प्रकाराचा आपण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करू.
वाङमय हे ‘माहिती’च्या (information) स्वरूपात असतं. माहिती या वस्तूचे काही विशिष्ट अर्थशास्त्रीय गुणधर्म असतात.
१. माहिती ‘निस्पर्धक’ आहे (information is non-rivalrous)
तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीबरोबर आईस्क्रीमच्या दुकानात जाता - एक आईस्क्रीमचा कोन (स्वतःच, एकट्याने) खाता. तोच कोन तुमच्या प्रिय व्यक्तीला खाता येत नाही, कारण तो खाऊन संपतो! प्रिय व्यक्तीला नवीन कोन घ्यायला लागतो! **
आता समजा दुकानात एकच कोन आहे – एकालाच मिळेल! आता त्या कोनसाठी तुम्ही ‘प्रतिस्पर्धी’ आहात!
माहिती या वस्तूचं तसं नसतं. एकाला मिळालेली माहिती तो दुसर्याला देतो. चांगलं पुस्तक वाचनात आलं, की आपण दुसर्याला सांगतो. आपण माहितीचा उपभोग घेतला (consumption), तरी माहिती (आईस्क्रीमसारखी) संपत नाही. (माहितीचा उपभोग घेणार्याने जर भर घातली, तर माहिती उलट वाढू शकते. विकीपीडीया याच तत्त्वावर चालतो.)
२. माहिती स्वस्त आहे
माहितीची ‘वाढीव किंमत’ (marginal cost) जवळजवळ शून्य असते. एक पुस्तक छापलं, की त्याच्या प्रती करायला जास्त खर्च येत नाही. नवीन तंत्रज्ञानामुळे तर ही वाढीव किंमत अजून कमी होऊन शून्यच होते. (आठवा: डाऊनलोड केलेली mp3 गाणी, पायरेटेड चित्रपटांच्या CD/DVD, पायरेटेड पुस्तकं वगैरे.)
याचे परिणाम पहा:
१. माहितीचं रक्षण सहसा कोणी करत नाही
२. (त्यामुळे) माहितीची चोरी करणं सोपं असतं
३. माहितीच्या चोरीची दखल सहसा कोणी गंभीरपणे घेत नाही
४. (त्यामुळे) माहितीच्या चोरीत काही लांच्छनास्पद आहे, असं समाजाला वाटत नाही (absence of social stigma)
अनिर्बंध बोकाळलेल्या वाङमयचौर्याची ही कारणं आहेत. लेखकाच्या दृष्टीने हे अत्यंत तापदायक आहे. वाङमयचौर्यात होरपळून अनेक लेखकांना उबग येतो – आणि ते लिहायचंच बंद करतात!
वर उल्लेख केलेल्या नंदन होडावडेकरांच्या ब्लॉगवरून हे स्पष्ट दिसतं. मार्च २००८ मध्ये वाङमयचौर्यावर भाष्य करणारा त्यांचा लेख प्रसिद्ध झाला. त्याआधीचे ३८ महिने श्री. नंदन यांच्या लेखनाची सरासरी महिन्याकाठी १.२७ लेख एवढी होती. मार्च २००८ नंतर हीच सरासरी महिन्याकाठी ०.२५ लेख एवढी आहे. म्हणजे तब्बल ८०% घसरण झालेली आहे! ##
वाङमयचौर्यावर दुर्दैवाने काही जालीम / रामबाण उपाय नाही. हे होणार, होतच रहाणार. प्रतिबंधाचे दोन उपाय आहेत – मागणी-बाजूचे उपाय (demand-side) आणि पुरवठा-बाजूचे उपाय (supply-side).
पुरवठा-बाजूचे उपाय – जगाला बदला!
१. कायदेशीर कारवाई
स्वामित्वहक्क कायद्यांचा (intellectual property law) आधार घेऊन चोरांवर कायद्याचा आसूड उगारता येईल. पण हे सर्वांना शक्य नाही. हौशी कवयित्री आणि ब्लॉगलेखकांना तर नाहीच नाही!
२. प्रतिबंध
आपला ब्लॉग संरक्षित (uncopiable) करा. ब्लॉगवर उजवी टिचकी (right click) मारायला मनाई करा.
मागणी-बाजूचे उपाय – स्वतःला बदला!
१. धिक्कार करा
चोराला सोडू नका. काही नाही तर त्यावर तोंडसुख तर आपण नक्की घेऊ शकतो. शक्य तितक्या सार्वजनिक ठिकाणी त्याचं वाभाडं काढा. त्याने सामाजिकदृष्ट्या लांच्छनास्पद, कलंकित कृत्य केलंय याची जाणीव करून द्या. यानेच तो social stigma निर्माण व्हायला मदत होईल.
२. दुर्लक्ष करा
काळाच्या ओघात सक्षम असेल तेच टिकतं. (Survival of the fittest.) आठशे वर्षांनंतरही मराठीच्या अभ्यासकाला ‘ज्ञानेश्वरी’ची मोहिनी पडते. तुमचं लेखन काळाच्या कसोटीला सिद्ध होईल, याचा विश्वास बाळगा. याचा अर्थ वाङमय-चोराला माफ करा असा होत नाही – क्षमा करा, पण विसरू नका! (Forgive but don’t forget).
३. सकारात्मक दृष्टिकोन
“आहेच माझं लेखन छान – कोणालाही चोरण्याचा मोह पडेल!” असा विचार करा. डोकं शांत ठेवा, लिहिते व्हा, लिहीत रहा!
राष्ट्रकवी समर्थ रामदास लिहून गेलेले आहेत:
श्रेष्ठ कार्ये करी श्रेष्ठ | कृत्रिम करी तो कनिष्ठ |
कर्मानुसार प्राणी नष्ट | अथवा भले ||११||
राजे जाती राजपंथें | चोर जाती चोरपंथें |
वेडें ठके अल्पस्वार्थें | मूर्खपणें ||१२||
मूर्खास वाटे मी शहाणा | परी तो वेडा दैन्यवाणा |
नाना चातुर्याच्या खुणा | चतुर जाणे ||१३||
(श्री दासबोध, समास पाचवा)
चाफळच्या या संन्याशाच्या वाङमयाची चोरी कोणी केली नाही – समर्थांनी चोराच्या कानाखाली जाळ काढला असता! धटासी असावे धट, उद्धटासी उद्धट…
__________________________________
तळटीपा:
** या परिस्थितीवरचा उपाय सुज्ञ वाचकांना आगोदरच उमगला असेल! एकच कोन अर्धा-अर्धा खाणे! [अर्धा कोन कसा खावा याबद्दल सुज्ञांस आम्ही काय सांगावे ;)] हा उपाय अर्थशास्त्राच्या Game Theory या शाखेच्या co-operation या उपशाखेत येतो. त्याबद्दल लिहीनच!
## होडावडेकर एक प्रतिभावंत लेखक / समीक्षक आहेत. त्यांच्या या ‘साहित्यिक मौना’मुळे मराठी सारस्वताचं नुकसान होत आहे. नंदन, तुमच्या वाचनात हा लेख कधी आला, तर माझी विनंती ऐका, परत लिहायला लागा…


काय करु शकतो आपण ?
ReplyDeleteया चोरांना पकडून त्यांना दाखवून दिले पाहिजे कि त्यांना अक्कल नाही.....ज्यांनी कविता छापल्या तिला तर समारंभात बोलवून जाहीर पणे सत्कार केला पाहिजे.....
ReplyDelete