मला ती बोलता बोलता म्हणाली, "हल्ली काय, तयार पापड विकत आणायचे आणि खायचे. आमच्यावेळी..." यापुढे गाडी वाळवणं, शेजारणी, कावळे, सबनिसांचा अंतू (जो पहाता पहाता वाळवणं फस्त करायचा) वगैरे स्टेशनं घेत जाणार हे उघड होतं. हल्लीच्या ‘रेडीमेड’ संस्कृतीबद्दलचा तिचा विषाद जाणवून गेला.
काळ बदलला, संस्कृती बदलणं अपरिहार्य आहे. आजीच्या काळापेक्षा आज अर्थव्यवस्था पुष्कळच प्रगत आहे. बदलत्या अर्थव्यवस्थेप्रमाणे श्रम आणि कौशल्यांची विभागणी (division of labour and specialisation) आपोआप होत जाते.
अॅडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाने लिहून ठेवलं आहे:
The greatest improvement in the productive powers of labour, and the greater part of the skill, dexterity, and judgment with which it is anywhere directed, or applied, seem to have been the effects of the division of labour.पण हेच एकमेव कारण नाही.
गेल्या पन्नास वर्षांत पूर्वीच्या एकत्र कुटुंबांचं विकेंद्रीकरण (neuclearisation) झालं. पूर्वीच्या कुटुंबांत चुलते-चुलत मिळून सुमारे २५ जण तरी असायचे. अधिक एखाद-दुसरा आश्रित, शिकायला ठेवलेला कोणतातरी दूरचा भाचा, गडीमाणसं, असा मोठा बारदाना असायचा. अधिक पंक्तीला दोनपाच मेव्हणे-पाव्हणे, आलागेला असे अजून चारपाच जण. एवढ्या माणसांचा स्वैपाक करणं हे त्या एकत्र कुटुंबांतल्या गृहिणींच्या ‘टीम’चं प्रमुख काम असायचं.
साधा हिशोब करूया: अशी अंदाजे ३० माणसं, आठवड्यातून (धरून चाला) तीनदा, प्रत्येकी दोन पापड खाणार. म्हणजे झाले [३० (माणसं) गुणिले २ (पापड प्रत्येकी) गुणिले २ (जेवणं) गुणिले ५२ (आठवडे)] वर्षाकाठी ६,२४० पापड. हे पापड घालायला घरच्या ५ लक्ष्म्या अधिक ३ शेजारणी, मैत्रिणी, गडी-स्त्रिया तरी असाव्यात - म्हणजे [६,२४० भागिले ८] ७८० पापड प्रत्येकी.
आता आजच्या चौकोनी कुटुंबाचा हिशोब (पापड खाण्याचं प्रमाण तेच ठेवून) - [४ (माणसं) गुणिले २ (पापड प्रत्येकी) गुणिले २ (जेवणं) गुणिले ५२ (आठवडे) बरोबर ८३२ पापड भागिले एकच गृहलक्ष्मी].
म्हणजे याचा अर्थ असा, की जर घरच्या घरी पापड घालायचा अट्टहास आजच्या चौकोनी कुटुंबातल्या गृहिणीने केला, तर तिचं काम (पूर्वीच्या एकत्र कुटुंबातल्या गृहिणीच्या तुलनेत) वाढेल! म्हणजे ‘छोटं कुटुंब, कमी काम’ हा सिद्धांत बोंबलला!
अजून एक बाब ध्यानात घ्यायला हवी. एकत्र कुटुंबांतल्या गृहिणीपेक्षा चौकोनी कुटुंबातली गृहिणी नोकरी करत असण्याची शक्यता जास्त आहे - चूल+मूल विरुद्ध चूल+मूल+ऑफिस. म्हणजे चौकोनी कुटुंबातल्या गृहलक्ष्मीला एक तर वेळ कमी आहे, आणि हातात हक्काचा पैसा आहे. एकत्र कुटुंबातल्या नोकरी न करणाऱ्या गृहलक्ष्मीच्या बरोबर उलट.
मग अशा परिस्थितीत तयार पापडांची बाजारपेठ तयार होणं स्वाभाविक आहे - (तुमच्याकडे तुलनेने जास्त असलेले) पैसे टाका, आणि (तुमच्याकडे तुलनेने कमी असलेला) वेळ वाचवा!
हा बदल नक्कीच हवाहवासा आहे - या योगाने पूर्वी कधीच अस्तित्त्वात नसलेली पापडाची बाजारपेठ तयार झाली. ‘लिज्जत पापड’ सारख्या संस्था उदयाला आल्या, आणि त्यांनी ‘लाटता येणे’ हे एकमेव कौशल्य (skill) अंगी असणाऱ्या स्त्रियांना रोजगार दिला. अर्थचक्राला गती मिळाली.
एकत्र कुटुंबांच्या विकेंद्रीकरणामुळे अशा अनेक नवीन वस्तू / सेवा जन्माला आल्या आहेत - चिरलेल्या भाज्या, पेस्ट कंट्रोल, तयार पीठ वगैरे.
कालाय तस्मै नमः ॥
_______________
तळटीप: माझ्या आजीचा जन्म झाला तेव्हा पुण्यात वीजसुद्धा नव्हती. आज तिचा नातू लॅपटॉपवर मराठीत लिहितो आणि मोबाईलवरून प्रसिद्ध करतो!
१९२० ते १९३० या काळात जन्माला आलेल्या या पिढीने खूप दुनियादारी पाहिली. कसे पचवले असतील त्यांनी हे बदल?


i love papad and i loved the analysis of it also! pudhil lekhanasathi shubhechha ani sarate shevati-
ReplyDeletejay papad!
घरच्या पापडाची चव वेगळीच लागते. लिज्जत पापडला ती नाहीच.
ReplyDelete